राम शिंदेंचं टेन्शन मिटलं; सुजय विखेंनी केली शिष्टाई


वेब टीम : अहमदनगर
कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज ना.प्रा.राम शिंदे यांनाच ताकद देण्याची घोषणा केली.

खा. सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर आज झालेल्या महासंग्राम युवा मंचच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ही घोषणा केली.

दि.९ सप्टेंबर रोजी राऊत यांनी कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन भाजपाने आपल्याला उमेदवारी द्यावी. अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले राहतील असा इशारा दिला होता. याबाबत दि २१ सप्टेंबर रोजी आपण आपली भूमिका मांडू असे जाहीर केले होते.

यामुळे गेली दहा दिवस मतदारसंघ व भाजपाच्या गोटात मोठी खळबळ माजली होती. राऊत कोणती भूमिका घेतात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यांनी निवडणूक लढवली तर प्रा.राम शिंदे यांचीच अडचण होईल, असेही बोलले जात होते मात्र राऊत यांनी ना. शिंदे यांचेच काम करण्याचा निर्णय घेऊन भाजपाला मोठा दिलासा दिला आहे.

यासाठी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांनी यशस्वी मध्यस्थी करत हा संघर्ष टाळल.आता ना. शिंदे यांची निवडणूक खा.विखे यांनी हातात घेतल्याने भाजपाच्या गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी राऊत यांनी यावेळी भूमिका व्यक्त करताना हा मेळावा घ्यायचा नव्हता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा मेळावा घेतला. ज्या दिवशी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझ्यावर प्रेम दाखवले त्याच दिवशी मी आमदार झाल्यासारखे वाटते.

असे म्हणत मी उभा राहण्याने भाजपाचा उमेदवार पडणार असेल तर ते पाप आपल्याला करायचे नाही. गेली आठ दहा दिवसात अनेक घडामोडी घडल्या काल खासदार डॉ.सुजय विखे यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली असता विचारविनिमय करून आम्ही विखेंच्या खांद्यावर मान टाकली आहे व ती ताठच राहणार,असा विश्वास आहे म्हणून आपण आगामी काळात भाजपाचेच काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यानी जाहीर केले.

यामुळे आपल्याला अनेक कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घ्यावी लागेल मात्र ते सहन करू. मी भाजपा सोडण्याची भाषा केली नव्हती तर आपला विचार व्हावा अशी अपेक्षा केली होती व पक्षानेही त्यांचा विचार केला असल्याचे विखेच्या चर्चेतून लक्षात येत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत राऊत यांनी केले. यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे, मंगेश पाटील, आबा पाटील, काका धांडे, संजय पोटरे, समीर पाटील, अनिल गदादे, अम्रृत काळदाते, रामदास हजारे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post