टाकळी ढोकेश्वर गटामध्ये पुन्हा झावरे-दाते यांची पारंपारिक लढत ? तालुक्यातील सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्वर गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष पारने...
टाकळी ढोकेश्वर गटामध्ये पुन्हा झावरे-दाते यांची पारंपारिक लढत ?
तालुक्यातील सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्वर गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. मात्र, या आरक्षणामुळे कहीं खुशी.. कहीं गम अशी पारनेर तालुक्यात परिस्थिती निर्माण झाली आहे. टाकळी ढोकेश्वर गटामध्ये शिवसेनेचे काशिनाथ दाते विद्यमान सदस्य आहेत. हा गट सर्वसाधारण झाल्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याशी पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास दाते झावरे हे प्रस्थापित एकमेकांसमोर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावतील व लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरेल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपून चार महिने उलटले होते त्यामुळे प्रशासकीय कारभार सुरू होता. आरक्षण जाहीर झाल्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सुरु आहे. गट व गण निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. २८) गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणानंतर अनेक गट व गणांत उलथापालत झाली असून, या आरक्षण सोडतीने जिल्ह्यात व तालुक्यात राजकीय समीकरणे बदलले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिल्या जातात. त्या अनुषंगाने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र, आरक्षण सोडतीनंतर काहींची अडचण झाली असून, काहींना मात्र आरक्षणाचा फायदा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप प्रमुख पक्ष असून, त्यांच्याकडे कार्यकत्यांची गर्दी आहे. तालुक्यात शिवसेना भाजपची युती होणार का येणाऱ्या काळातच समजेल परंतु प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या देखील अधिक आहे. जिल्हा परिषद सहा गटांमध्ये तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारीबाबत चाचणी केली. आमदार नीलेश लंके यांनी यापूर्वीच काही गटांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी तालुक्यात पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचे दिसते.
विखे गटाचे सचिन वराळ व राहुल शिंदेकडे लक्ष
सुपा व निघोज जिल्हा परिषद गटामध्ये आता कशा लढती होणार याकडे सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सुपा हा जिल्हा परिषद गट आमदार निलेश लंके यांचा हक्काचा गट असल्याने त्या ठिकाणी विखे गटाचे राहुल शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे तसेच निघोज जिल्हा परिषद गट व गणात सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण आल्यामुळे सचिन पाटील वराळ यांच्यासाठी सुद्धा सर्व पर्याय आता खुले झाले आहेत त्यामुळे विखेंचा काय आदेश येतो आणि सचिन वराळांची नेमका भूमिका काय असेल याकडे सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
COMMENTS