ट्रेनिंग विसरा, आराम करा ! विश्वचषकासाठी BCCI चा टीम इंडियाला सल्ला


मुंबई - 
३० मे पासून सुरु होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतीय खेळाडू नुकतेच आयपीएलचा बारावा हंगाम संपवून मोकळे झाले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण येत होता. यावर उपाय म्हणून बीसीसीआयने विश्वचषकाआधीच्या मालिकांमध्ये महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. आता आगामी विश्वचषकासाठी BCCI ने टीम इंडियाच्या खेळाडूंना एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना तात्काळ सरावाला न सुरुवात करता आराम करावा असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

२२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. मात्र त्याआधी खेळाडूंनी स्वतःला सरावामध्ये न जुंपता आपल्या परिवारासोबत वेळ घालवावा, फिरायला जावे आणि २१ मे रोजी मुंबईत सकारात्मक मन आणि विचाराने परत यावं असा संदेश खेळाडूंना देण्यात आला आहे. यानंतर कर्णधार विराट कोहलीने सुट्टी घेत बाहेर जाणं पसंत केले आहे. उप-कर्णधार रोहित शर्माही आपली पत्नी आणि मुलीसह मालदीवला गेला आहे. तर फिरकीपटू युजवेंद्र चहल गोव्याला गेला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने ही कल्पना दिली असल्याचं बोलले जात आहे

२०१८ सालात भारतीय संघ एकामागोमाग एक मालिका खेळतो आहे. त्यातचं आयपीएल आणि विश्वचषक यांच्या अवघ्या काही दिवसांचं अंतर आहे. एवढ्या व्यस्त वेळापत्रकाचा खेळाडूंच्या शरिरावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचसोबत मोठ्या कालावधीपर्यंत खेळाडू आपल्या परिवारासोबत राहिलेले नसतात. अशावेळी आपल्या मित्रांसोबत-परिवारासोबत काहीकाळासाठी फिरायला गेल्यास त्यांच्यावरचा भाल हलका होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआयचं म्हणने आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post