कल्याण-माळशेज रस्ता चौपदरीकरण भूसंपादनास मिळाली तत्त्वत: मंजुरी ----------- दिल्लीत झाली बैठक : घाटात बोगद्यासाठी अडीच हजार कोटींच्या प्रस्त...
कल्याण-माळशेज रस्ता चौपदरीकरण भूसंपादनास मिळाली तत्त्वत: मंजुरी
-----------
दिल्लीत झाली बैठक : घाटात बोगद्यासाठी अडीच हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी :
कल्याण मुरबाडमार्गे माळशेज घाट रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे बुधवारी (दि. ४) पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
या बैठकीस केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे उपस्थित होते. कल्याण मुरबाडमार्गे माळशेज रस्ता हा दुपदरी होता. हा रस्ता चौपदरी झाल्यास हा रस्ता अधिक प्रशस्त होईल. रस्त्याच्या चौपदरीकरणास १२०० कोटी रुपये खर्च होणार आहे. वरप-कांबामार्गे माळशेज घाट हा रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना यावेळी मंत्री गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कल्याण-मुरबाडमार्गे माळशेज या रस्त्यावर शहाड येथे रेल्वे उड्डाणपूल आहे. रस्त्याचे चौपदरीकरण केले जात असताना या पुलाचे रुंदीकरण करण्यासही तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर शीळफाटा- एरंजाड म्हसा धसईमार्गे माळशेज घाट, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे, माळशेज घाटात पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी काचेचा स्काय वॉक व गार्डन बांधण्यासाठीचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
बदलापूर स्थानकाचा विकास करा कथोरे
बदलापूर रेल्वे स्थानकातील विविध समस्यांसोबतच इतर समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार किसन कथोरे यानी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यामध्ये बदलापूर स्थानकाच्या विकासा सोबत गर्दीच्या वेळेस महिलांसाठी विशेष लोकल वाढवण्याची मागणी करण्यात आली. गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत रेल्वेच्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी मतदारसंघातील रेल्वेच्या विविध विकासकामांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या..
माळशेज घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना होतात. परिणामी माळशेज घाटातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे कल्याण-नगरचा संपर्क ठप्प होतो. माळशेज घाटाच्या पायथ्यापासून मढपर्यंत घाटात एक बोगदा मार्ग तयार केला जावा, अशी मागणी आमदार कथोरे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला आहे. घाटात बोगदा खोदण्यासाठी दोन हजार ४७८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांसाठी वाढीव लोकल सुरु करण्याची मागणी करण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उर्वरित भागात शेड उभी करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत रेल्वे मार्गाच चौपदरीकरण व कल्याण-कसारा मार्गावर नवीन गुरवली रेल्वे स्थानकाबाबतीत पुन्हा एकदा सर्व्हे करून फिसीबिलिटी रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना दानवेनी दिल्या.
खडवली व वांगणी येथे मान्यता मिळालेल्या रेल्वे ओव्हर बीजचे काम लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही सांगितले. कर्जत कसारा या नवीन रेल्वे लाईनच्या मागणीसंदर्भात लवकरात लवकर सर्व्हे करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
किसन कथोरे यांनी कल्याण कसारा व कल्याण कर्जत दरम्यान असलेल्या सर्व स्थानकांवर अद्यावत सुविधा तसेच सरकते जिने बसवण्यासंदर्भात चर्चा केली.