अ.नगर – न्यू आर्ट्स कॉलेज अहिल्यानगर बीबीए व बीबीए (आयबी) विभागाने माजी विद्यार्थी मेळावा २०२५ आयोजित केला. या कार्यक्रमाची सुर...
अ.नगर – न्यू आर्ट्स कॉलेज अहिल्यानगर बीबीए व बीबीए (आयबी) विभागाने माजी विद्यार्थी मेळावा २०२५ आयोजित केला. या कार्यक्रमाची सुरुवात तृतीय वर्षाची विद्यार्थिनी महिमा वर्मा हिच्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर २००४ ते २०२४ या काळात बीबीए विभागातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे होते. बाहेरच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास, कठोर परिश्रम व जिद्द या त्रिसूत्रीचा सांगड असेल तर एक यशस्वी माणूस तयार होतो असे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी नमूद केले तसेच विद्यार्थ्यांना पैलू पाडण्यात व एक आदर्श विद्यार्थी घडविण्यात बीबीए विभागाचे खूप मोठे योगदान आहे असे आपल्या मनोगतात सांगितले व माजी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बीबीए विभागाचे विभागप्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना नाते जपण्याचे व ते सांभाळण्याचे आवाहन केले. हल्लीच्या सोशल मिडियाच्या व धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर जात आहे व यातील दरी मिटून माणुसकी जपण्याची विनंती उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केली. तसेच बीबीयन्स च्या माध्यमातून ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याद्वारे सामाजिक उपक्रम, बीबीयन्स ला मदतीचा हात, ज्युनियर बीबीएच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सहकार्य व विभागाच्या विकासासाठी मदतीचा हातभार लावण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीबीए विभागाचे प्रा. डॉ. सतीश जगताप यांनी केले. यावेळी बीबीए अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा बदलता प्रवाह, व्यावसायिक शिक्षणाची वाट व त्यास माजी विद्यार्थ्यांची असलेली साथ या विषयावर भाष्य केले. उद्घाटन सोहळ्यानंतर विभागाचे माजी विद्यार्थी संगीतकार गिरीराज जाधव व तबलावादक सार्थक डावरे यांच्या सांगीतिक गाण्यांच्या आविष्कारातून माजी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले व आपल्या जुन्या कॉलेजच्या आठवणीत रमून गेले. सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला व बीबीए विभागाप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये नीलम क्षिरसागर (स्टेट बँक ऑफ इंडिया), केदार भोपे (पत्रकार, मराठी NEWJ), महेश जावळे (उद्योजक), महेश धुमाळ (सुवर्णम प्राइड), तृप्ती खाबीया (प्राध्यापिका), चैतन्य पाटील (उद्योजक), प्रदीप थोरवे (सामाजिक कार्यकर्ता), पूजा कुलकर्णी (ऑस्ट्रीच प्लेसमेंट फर्म पुणे) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, इंग्लंड यासारख्या अनेक बाहेरील देशातील माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून बीबीए विभागावर कौतुकाचा वर्षाव केला. जुने वर्गमित्र , मैत्रिणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी बीबीए विभागातील आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे आनंदाश्रुंनी पाणवले होते. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आल्यावर सेल्फीचा मोह आवरता आला नाही. आपल्या वर्गात जाऊन अनेक आठवणींच्या छायाचित्रांचा कोलाज आपल्या मनात व मोबाईल मध्ये चित्रित केला. जाताना विभाग प्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी सर्वांना गुलाबाची रोपे भेट देऊन संवर्धन करण्यास सांगितले व आपली प्रगतीकडे वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या. या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात १५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली व उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला. त्यामुळे हा मेळावा अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी झाल्याचे विभाग प्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी सांगितले.
गप्पा, मजा, मस्ती, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, लाईव्ह कॉन्सर्ट अशा विविधांगी आविष्काराने सजलेला हा माजी विद्यार्थी मेळावा कृतज्ञेची साक्ष देत होता.
या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत सातभाई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राहुल थोरात, प्रा. अनिता पेटकर, प्रा. शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर, डॉ रूपाली मिस्कीन यांनी अथक परिश्रम घेतले