सशक्त कथानक, उत्कंठा वाढवणारी पटकथा, सहजसुंदर अभिनय, उत्तम लोकेशन्स,प्रयोगशील दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये य...
सशक्त कथानक, उत्कंठा वाढवणारी पटकथा, सहजसुंदर अभिनय, उत्तम लोकेशन्स,प्रयोगशील दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये यांच्या आधारे नुकताच प्रदर्शित झालेला ‘अष्टपदी’ हा सिनेमा काळजाला भिडतो.प्रेमाची एक वेगळी पण नितळ,सुंदर गोष्ट यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
प्रेम या गोष्टीभोवती अनेक सिनेमे यापूर्वी आले आहेत.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अष्टपदी’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहायला मिळालेले उत्कंठावर्धक असे कथानक पाहायला मिळणार आहे.भारतीय संस्कृतीतील लग्न हा महत्त्वाचा घटक मानला जातो. या निमित्ताने केवळ दोन जीवांचे नाते जोडले जात नसून, दोन कुटुंब एकत्र येत असतात. या चित्रपटात भारतीय लग्नसंस्थेवर महत्त्वपूर्ण असे भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला असून लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरचे आजवर कधीही समोर न आलेले रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे.त्याने साकारलेली भूमिका वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या जोडीला अभिनव पाटेकर व मयुरी कापडणे या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात सरस ठरली आहे.
‘अष्टपदी’मधील नयनरम्य लोकेशन्स आणि तिथे शूट करण्यात आलेली दृश्ये प्रेक्षकांचे मन मोहित करून टाकतात. संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणे यांच्यासोबत या चित्रपटात अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे, जगदीश हाडप, महेश जोशी आदी कलाकारांची फौज आहे. गीतकार गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेली गाणी संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली असून, पार्श्वसंगीतही त्यांनीच दिलं आहे. धनराज वाघ या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर असून, निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. अतुल शिधये यांनी रंगभूषा, तर अंजली खोब्रेकर, स्वप्ना राऊत यांनी वेशभूषा केली आहे. नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, कार्यकारी निर्माते अजय खाडे आहेत. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही निर्माते उत्कर्ष जैन यांनीच केले आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे.
विवाहामधील एक महत्वाचा विधी म्हणजे सप्तपदी.सप्तपदी म्हणजे हिंदू विवाह विधीमध्ये वधू आणि वर एकत्र सात पावले (किंवा फेरे) घेतात, जे सात जन्मांचे बंधन दर्शवते. हे एक महत्त्वाचे संस्कार आहे, ज्यात वधू-वर एकमेकांना सात वचनं देतात. या विधीमध्ये वधू-वरांसमोर तांदळाच्या सात राशी ठेवल्या जातात. सात मंत्रांच्या जपाने वराने वधूला चालवत त्या बाजूला सारल्या जातात. एकेका राशीवर उजवे पाऊल ठेवत प्रत्येक पाऊल ठेवल्यावर मंत्र म्हणतात. त्यात हा सिनेमा 'अष्टपदी' आठव्या वचनाबद्दल महत्वपूर्ण भाष्य करतो. उत्कृष्ट लेखन, मोजकी आणि प्रभावी संवादरचना, सुंदर संगीत, संवेदनशील अभिनय, आणि उच्च दर्जाचं दिग्दर्शन यामुळे ‘अष्टपदी’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा अनुभव न राहता, तो अंतर्मनाला स्पर्श करतो.
या सिनेमाची गोष्टी साधी सरळ वाटत असली तरी त्या कथानकात अनेक रंजक गोष्टी लपलेल्या आहेत. एका संगीत विद्यालयात शिकणारे दोन विद्यार्थी प्रेमात पडतात. पण त्या संगीत विद्यालयाच्या शिक्षिका यांनी एक अनोखे वचन त्यांच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले असते. संगीत विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकमेकांच्या प्रेमात पडायचे नाही. हे वचन देण्यामागे त्या शिक्षकांचा भूतकाळ असतो. शेवटी जे व्हायचं ते होतंच. दोन विद्यार्थी हे प्रेमात पडतात आणि मग त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळते. त्यात अभिनव पाटेकर व मयुरी कापडणे यांनी साकारलेली प्रियकर-प्रेयसीची भूमिका लक्षवेधी झाली आहे. अभिनव यांनी साकारलेला गायक चपखल वाटला तर मयुरी यांनी देखील त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. या दोघांच्या आयुष्यात तिसरा व्यक्ती येतो जो मयुरीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसतो. तो म्हणजे माजी आमदार यांचा मुलगा. मग तेथून सिनेमाला गती प्राप्त होते आणि एकेक गोष्टी भारी वाटायला लागतात. ‘कुणीच नसावं अवतीभवती, समोर तू असताना…’ अशा काव्यरचनेने ‘अष्टपदी’मध्ये संतोष जुवेकर यांनी साकारलेला विक्रांत लक्षात राहतो.आमदाराचा मुलगा त्याने उत्तम साकारला आहे. संतोषच्या रूपातील कवीमनाचा नायक दिसतो आणि त्याने जिच्यासाठी हे काव्य म्हटले ती नायिका मयुरी कापडणेही लक्ष वेधून घेते. चित्रपटातील सर्वांच्या भूमिका समर्पक झाल्या आहेत. प्रेमाचे विविध रंग उधळणारी दृश्ये या सिनेमात ठासून भरलेली आहेत, जी ‘अष्टपदी’बाबत उत्सुकता वाढवतात. उत्तम कथानक ,दर्जेदार अभिनय व गोष्टीला अनुरूप असणारी गाणी यामुळे सिनेमाला एक वेगळी उंची प्राप्त होते. याला सुमधूर गीत-संगीत आणि अर्थपूर्ण संवादांची जोड देण्यात आली आहे.थोडक्यात काय तर या चित्रपटात प्रेमाची अनोखी व्याख्या या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सिनेमाची सुरुवात छानश्या गाण्याने होते. कोल्हापुरातील उत्तम निसर्गसौंदर्य कॅमेरात अचूक टिपले गेले आहे. सहजसुंदर लोकेशनमुळे नजर पडद्यावरून हटत नाही. हिरवाई ठासून भरलेली आहे यामुळे प्रत्येक सीन हा बहारदार होतो. नायक आणि एक नायिका असलेल्या या चित्रपटात खरं प्रेम कुणाला मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सशक्त कथानक, उत्कंठा वाढवणारी पटकथा, सहजसुंदर अभिनय, प्रयोगशील दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये यांच्या आधारे ‘अष्टपदी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतो. हा चित्रपट प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा आहे. प्रेमाचे आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहताना प्रत्येक रसिकांना कुठे ना कुठे त्यात आपले प्रतिबिंब दिसेल. 'अष्टपदी' या सिनेमात सांगण्यात आलेले महत्वपूर्ण असे आठवे वचन काय आहे ते तुम्हाला सिनेमागृहात सिनेमा बघितल्यावरच कळेल. आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वतोपरी मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे ‘अष्टपदी’ पाहताना जाणवते.एकत्र कुटूंबाने आनंद घ्यावा असा संगीतमय प्रेमाची नितळ गोष्ट असलेला 'अष्टपदी' हा मराठी चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.
चित्रपट- अष्टपदी
भाषा- मराठी
निर्मिती-महश्री प्रॉडक्शन व युवराज सिने क्रिएशन
दिग्दर्शक- उत्कर्ष जैन
लेखक- महेंद्र पाटील
कॅमेरामन- धनराज वाघ
गीतकार-गणेश चेऊलकर व प्रशांत जामदार
निर्माता-उत्कर्ष जैन
कलाकार- अभिनव पाटेकर, संतोष जुवेकर,
मयुरी कापडणे,मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे, जगदीश हाडप व महेश जोशी आदी...
स्टार- **** (चार)
आशिष निनगुरकर
[लेखक चित्रपट अभ्यासक आहेत. ]