अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ०९ मधील सिद्धार्थनगर भागात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ०९ मधील सिद्धार्थनगर भागात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक धनंजय कृष्णा जाधव यांनी दिला आहे.
माजी नगरसेवक धनंजय कृष्णा जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिद्धार्थनगर हा मोठ्या लोकवस्तीचा भाग असून, अनेक पालिका कर्मचारी याच प्रभागात राहतात. अनेक दिवसांपासून येथे कचरा साचल्याने त्यांचे व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा कचरा साचला आहे, त्याच्या बाजूला करंदीकर हॉस्पिटल आणि महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
जाधव यांनी आयुक्तांना विनंती केली आहे की, संबंधित विभागाला सिद्धार्थनगर भागातील कचरा त्वरित उचलण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा, सर्व नागरिकांसोवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे.