नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार पारनेर प्रतिनिधी : नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या अल्टो कारची समोर चाललेल्या ...
नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार
पारनेर प्रतिनिधी :
नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या अल्टो कारची समोर चाललेल्या अज्ञात वाहनास जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघ जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामरगांव शिवारात हा अपघात झाला.
बाजीराव मिसकर व ओम मिसकर (रा. जळगांव, ता मालेगांव, जि. नाशिक) हे दोघे अल्टो कारमधून (क्र. एम. एच.१५ बी.एन.७२९६) जेजुरी, जि. पुणे येथे दर्शनासाठी निघाले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते नगर शहर ओलांडून पुण्याच्या दिशेने निघाले असता कामरगांव शिवारात त्यांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोर चाललेल्या अज्ञात वाहनास जोराची धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर होवून मिसकर बाप लेक हे जागीच ठार झाले. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन होण्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. पहाटे चालकाची झोप अनावर झाल्याने समोर चाललेल्या वाहनास कारची धडक बसली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर धडक बसलेले वाहन तेथे न थांबता निघून गेले.
अपघाताची माहीती समजल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी नगरच्या शासकिय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. रस्त्यावरील अपघातग्रस्त कार दूर करण्यात येवून वाहतुकही सुरळीत करण्यात आली.