पाणी योजनेसाठी सोनईच्या ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन


अहमदनगर : DNALive24
नेवासा तालुक्यातील सोनई येथील पाणी योजनेच्या कामासाठी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पाणी प्रश्‍न सोडवा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सोनई ग्रामस्थांनी दिला आहे,

सोनई गावासाठी सोनई करजगाव व इतर 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून योजना तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. योजना सुरु होण्यापूर्वी सोनई गावास मुळा धरणातून कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, अपूर्ण असलेली योजना कार्यान्वीत केल्यापासून सोनई गावास योजनेद्वारे 10 दिवस पाणी पुरवठा केला जातो तर 20 दिवस योजना बंद केली जाते.

योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, अहमदनगर यांनी एका खाजगी कंपनीला दिलेले असून कंपनीकडून करण्यात आलेली योजना ही अपूर्ण असून गावातील पाईपलाईन लिकेज आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेल्या नाहीत. अपूर्ण योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी म्हणून पाणीपुरवठा खंडित करुन ग्रामस्थांना त्रास दिला जात आहे.

ऐनदुष्काळात पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सोनई गावची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करावी अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अहमदनगर यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या निवासस्थानासमोर 3 जून रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सोनई पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला आहे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज सोनई ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post