छावणीत वाढीव जनावरे घेण्यास प्रशासनाची टाळाटाळ; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात ठिय्या


वेब टीम : अहमदनगर
शासनाने दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याच्या हेतुने नगर तालुक्यात छावण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने छावण्यात शेतकऱ्यांची नविन जनावरे दाखल होत आहे. मात्र प्रशासन या जनावरांना छावण्यात घेण्यास परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. चाऱ्याअभावी जनावरांचा पोटमारा होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. छावणीत नविन जनावरे घेण्यास तत्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी करत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तहसीलदारांकडून परवानगी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. दुष्काळात चारा व पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना छावण्यांचा मोठा आधार मिळाला. ज्या शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध होता त्यांची जनावरे दावणीलाच होती. मात्र पावसाने मारलेली दडी अन् चाराच संपल्याने छावणीबाह्य असलेली दावणीतील जनावरे मोठया संख्येने छावणीत दाखल होत आहेत. नविन जनावरांना छावणीत घेण्यास प्रशासन परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. घरचा चारा संपला, परवानगीअभावी शासनाचाही चारा मिळेना अशा अवस्थेत जनावरांचा पोटमारा होत आहे. आमची जनावरे छावणीत घेण्यास तत्काळ परवानगी द्यावी अशी मागणी होत असून प्रशासकीय अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील वाळकी, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुई छत्तीशी सह अन्य गावातील शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध असल्याने छावणी बाह्य जनावरांची संख्या मोठी होती. पावसाने दिलेला ताण आणि दावणीचा चारा संपल्याने नविन जनावरे छावणीत येत आहेत. मात्र परवानगी शिवाय या जनावरांना चारा मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय छावणीचालक नविन जनावरे छावणीत घेण्यास तयार होत नाहीत. यामुळे शेतकरी व चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग रोजच उद्भवत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post