परळीत धनंजय मुंडे यांचा सरकारविरोधात भव्य धडक मोर्चा


वेब टीम : बीड
परळी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, निराधार, युवकांच्या प्रश्‍नांसह सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी आज धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले. मुंडेंच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला.

या मोर्चात हजारोंच्या संख्येने कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह युवक आणि महिला उपस्थित होत्या. प्रशासनाच्या उरात धडकी भरवणारा आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या फडणवीस सरकारला जागं करणारा मोर्चा म्हणूनही याकडे पाहितलं जाईल असा विश्‍वास राष्ट्रवादीला आहे.

आज सकाळी अकरा वाजता परळी शहरातील मोंढा भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, निराधार, दिनदुबळे, युवक, महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. या सर्वांच्या प्रश्‍नांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे धडक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते.

परळी मतदारसंघातील शेतकर्‍यांना सोयाबीनसह इतर पीकविमा द्या, वैद्यनाथ साखर कारखान्याकडे थकीत असलेले उसाचे बिल द्या, दुबारपेरणीसाठी शेतकर्‍यांना २५ हजाराची हेक्टरी मदत द्या, तालुक्यात कृत्रीम पाऊस पाडा, सरसकट कर्जमाफी द्या, फळबागांचे अनुदान, तूर, उडीद, मुगाचे पैसे तात्काळ द्या, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण, खडका धरणात जायकवाडीचे पाणी सोडा, त्यातून पाणीपुरवठा करा यासह अन्य मागण्यांसाठी या धडक मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी शासनासह प्रशासनाला खडबडून जागे केले. सदरचा मोर्चा हा मोंढा येथून शिवाजी चौक, आझाद चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला.

या वेळी मोर्चात उपस्थित मोर्चेकर्‍यांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पालकमंत्री पंकजा मुंडेंंविरोधात घोषणा दिल्या. या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय यासह अन्य घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले. धडक मोर्चामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे मोठ्या प्रमाणावर फडकताना दिसून येत होते. युवकात आणि शेतकर्‍यात सरकारविरुद्ध संताप व्यक्त होताना पहावयास मिळत होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post