राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन


वेब टीम : मुंबई
राज्यातील आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी १६ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दि. २६ ते २९ ऑगस्ट या काळात वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


दरम्यान, या महाआरोग्य शिबीराचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या सोमवारी दि. २६ ऑगस्ट रोजी ठाणे येथुन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याशिबिराचे उद्घाटन होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृह येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, पुणे व अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधे व उपचार, आवश्यक त्या शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा आदी आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी जनसामान्यांपर्यंत व समाजाच्या शेवटच्या घटकातील गरजू रुग्णांना 14 प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. शिबिराच्या ठिकाणी पौष्टिक आहार, सिकल सेल, ॲनेमिया, स्वच्छता व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध कार्यक्रमांबाबत प्रदर्शन स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post