आ. बाळासाहेब मुरकुटे यांची विधानसभेची वाट बिकट : भाजपातूनच विरोध


वेब टीम : अहमदनगर
नेेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास तालुक्यातून कडाडून विरोध केला गेला असून युवा नेते सचिन देसरडा यांना उमेदवारी दिल्यास एकदिलाने जागा राखण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते भगवान गंगावणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमीत्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी या वेगवान घडामोडी घडल्या आहेत.

ज्येष्ठ नेते भगवान गंगावणे यांचा 59वा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच वडाळा बहिरोबा येथे संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. यावेळी माजी खासदार तुकाराम गडाख, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, दिगंबर शिंदे, रामदास गोल्हार, भाजपचे सचिन देसरडा, नितीन दिनकर, दिनकर गर्जे, ज्ञानेश्वर पेचे, शिवसेनेचे मच्छीन्द्र म्हस्के, बाळासाहेब पवार, तसेच अशोक शेळके, दिलीप मोटे, ऍड. अण्णासाहेब अंबाडे, दत्तात्रय लोहकरे, राजेंद्र वाघमारे, सुरेश डिके, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी गंगावणे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर सर्वच वक्त्यांनी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्ला चढवत भाजपने परत उमेदवारी देण्यास विरोध करण्यात आला. मागील वेळी युती, आघाडी नसल्याने प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र उमेदवार असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, आदी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी एकदिलाने खिंड लढवून सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणले. परंतु त्यानेही तोंड फिरवल्याने मोठा भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांच्यावरच नामुष्कीची वेळ ओढवल्याचे चीड व्यक्त करण्यात आली. भाजपने यावेळी आमदार मुरकुटे यांनाच उमेदवारी दिल्यास तालुक्यात भाजप तीन-चार क्रमांकावर फेकला जाण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी संभाजी दहातोंडे यांनी असंतुष्ट कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. जवळपास सर्वच वक्त्यांनी सचिन देसरडा यांच्या उमेदवारीस अनुकूलता दर्शवून प्रसंगी तालुका विकास आघाडीचा प्रयोग राबविण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे आमदार मुरकुटे यांच्या राजकीय अडचणी वाढल्याची चर्चा तालुक्यात झडू लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post