राष्ट्रवादीला झटका : 'या' महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या रश्मी बागल-कोलते यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांचे बंधू दिग्विजय बागल, विलासराव घुमरे व कार्यकर्त्यांनीही यावेळी सेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात बागल गटाची संपर्क कार्यालयासमोर समर्थकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती़ या बैठकीत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार मंगळवार २० ऑगस्ट रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता़.

ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मातोश्रीवर रश्मी बागल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश नीळ-पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन घोलप, अदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

२०१४ सालच्या करमाळा विधानसभेत रश्मी बागल यांचा २५७ मतांनी पराभव झाला होता. रश्मी बागल या दिवंगत माजी आमदार आणि मंत्री दिंगबर बागल यांच्या कन्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post