शरद पवार इन ऍक्शन : राहुरीत घेतला नगर जिल्ह्याचा आढावा


वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल गुरूवारी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मुक्कामात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांशी गुफ्तगू केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहे.

काही नेत्यांना त्यांनी आवर्जून भेटीसाठी बोलावून त्यांच्याकडून राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. या नेत्यांशी त्यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला जिल्ह्यात फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

राहुरी विद्यापिठ आणि श्रीरामपुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. काल दुपारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आले असता त्यांनी विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी, संशोधक यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर पक्षाला जिल्ह्यात पुन्हा उभारी देण्यासाठी काय करता येईल यासाठी राहुरी तालुक्यातील व अन्य ठिकाणच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती हाती आली आहे. तसेच विविध मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा त्यांनी आढावा घेतला.

राहुरी विद्यापिठातील मुक्कामाच्या दरम्यान त्यांनी राजकीय सुत्रे हलविल्याची चर्चा रंगली आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे, शब्बीर देशमुख, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, एकनाथ घोगरे यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, राहुरीचे माजी आ. चंद्रशेखर कदम यांनीही पवार यांची भेट घेतली असून पवार हे कदम यांचे जवळचे नातेवाईक असल्याने या भेटीबाबतही राजकीय वर्तुळाची उत्सुकता ताणली गेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post