आता हे मॉडेल 'आऊटडेटेड' झाले आहे : ना. विखेंचा थोरातांना टोला


वेब टीम : संगमनेर
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये एकमेकांचे सहकारी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वर्चस्वाची लढाई आता तीव्र झाली आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे यांना शह देण्यासाठी काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांना पुढे केले. नंतर प्रदेशाध्यक्षपद ही दिले. विखेंनी आता थेट थोरातांना आव्हान दिले आहे. बाळासाहेबांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्येच त्यांनी संपर्क कार्यालय थाटल्याने राजकीय संघर्ष चिघळणार आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल सोमवारी पार पडले. काँग्रेस मध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचे अनेकदा बघायला मिळाले. मात्र आता विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झाले आहे. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात म्हणजेच संगमनेर शहरात सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विखे यांनी नाव न घेता थोरात यांच्यावर टीकास्त्रही सोडले.
महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वीच काँग्रेसने केली. मात्र विखे पाटलांनी प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरू केलीय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षीय थोरात विरोधक विखेंच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. संगमनेर तालुका टँकर युक्त ठेवण्याचे थोरातांना भूषण असून  तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळले असल्याची टीका विखेनी थोरातांवर केली.

आता हे मॉडेल आऊट डेटेड झाले आहे.  त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून 'हम सब एक है' असा नारा देत विखेंनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्यापुढे विखे पाटील यांनी मोठं आव्हान निर्माण केले असून थोरात त्याला कसे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post