साधा पाणी प्रश्न सोडविता आला नाही मग यांना आमदार करून काय उपयोग : विखेंनी घेतला थोरातांचा समाचार


वेब टीम : अहमदनगर
राज्यात काँग्रेसचा आमदारच निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती असेल, तर संगमनेर तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून देवून उपयोग तरी काय? अशा टोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.

राज्यात विखे-थोरातांचे वैर संपूर्ण सर्वश्रुत आहे. त्यातच ना. विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये अधिक लक्ष घातल्याने विखे-थोरात यांचा टोकाचा संघर्ष पहावयास मिळणार आहे.

वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले गेले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहीला नसल्याने त्यांना कामं करणारी माणसं हवी आहेत. लोकसभेच्या निकालातून जनतेने युतीलाच पाठबळ दिले.

आता राज्यातही चित्र बदलत चालले आहे. काँग्रेसला व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारी संख्या दिवसागणिक वाढत आहेत. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना? असा खोचक सवाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केला.

संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे २ कोटी ७६ लाख २३ हजार रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत नळपाणी पुरवठा योजनांसह ३६ लाखाच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ आणि आंभोरे येथे युती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे २ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

विखे-पाटील पुढे म्हणाले, निळवंडेच्या पाण्यासाठी तालुक्याला पंचवीस वर्षे वाट पहावी लागली. टॅकरद्वारे पाणी देन्यातच त्यांना पंचवीस वर्षे भूषण वाटले. दुषाकाळाचे मॉडेल अशी तालुक्याची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली. आता तुम्हाला २५ वर्षे कोणत्याही प्रश्नासाठी वाट पाहावी लागणार नाही.

आलेली संधी दवडू नका, राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा आमदार निवडून देवून काय उपयोग? 'तालुक्यात तुम्ही परिवर्तन करा, मी दीड वर्षात पाणी देतो' अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

निळवंडे प्रश्नांवर बोलताना विखे पुढे म्हणाले, निळवंडे कालव्यांची काम सुरू झाल्याने लोकांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. पिचडांच्या सहकार्याने सुरू झालेली कालव्यांची काम पूर्ण करून दीड वर्षात उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी देण्याचे सरकारचे धोरण असून यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे.

सामान्य माणसासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे भक्कम पाठबळ सरकारला आहे. राज्यात काँग्रेसचा आमदारच निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती असेल, तर या तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून देवून उपयोग तरी काय? युतीचा आमदार निवडून गेला तरच पंचवीस वर्षे प्रलंबित राहीलेली काम मार्गी लागू शकतील. त्यामुळे युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा प्रश्न सोडविण्याची हमी मी घेतो असे आश्वासन विखे यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post