अहमदनगर : रस्त्यावर कचरा फेकल्याने पोलिसांनी दाखल केला गुन्हा


वेब टीम : अहमदनगर
रस्त्यावर केरकचरा करु नये अशी नोटीस देऊनही केडगाव येथील पानटपरीचालकांनी नोटीशीचा अनादर करुन रस्त्यात केरकचरा फेकून परिसर अस्वच्छ केल्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि.24) सायंकाळी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केडगाव परिसरातील दुकानदार, टपरीचालक, हॉटेल व्यावसायिकांना कोतवाली पोलिसांनी त्यांच्या व्यवसाय संबंधीचा केरकचरा रस्त्यात टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा अशी सी.आर.पी.सी.149 प्रमाणे नोटीसा बजावल्या होत्या.

त्यानंतर रस्त्यावर कचरा फेकून परिसर अस्वच्छ करणार्‍यांवर कोतवाली पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असता जाकीर अकबर पठाण (वय 38, रा.राधाकृष्ण कॉलनी, एकनाथनगर, केडगाव) याने नोटीस मिळुनही नोटीसीचा अनादर करीत पानटपरीसमोर केरकचरा टाकून परिसर अस्वच्छ केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पो. कॉ.प्रशांत पवार यांच्या फिर्यादीवरुन जाकीर पठाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 188 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 115/117 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक के.बी.बारवकर हे करीत आहेत.

दुसर्‍या कारवाईत एकनाथनगर येथील भूषण विक्रम सुपेकर (वय 24, रा.भाग्योदय मंगल कार्यालयाशेजारी, एकनाथनगर, केडगाव) याने त्यास सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस मिळाली असतानाही नोटीसीचे उल्लंघन करुन त्याच्या पानटपरीसमोर केरकचरा टाकून परिसर अस्वच्छ केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पो.कॉ.प्रशांत पवार यांच्या फिर्यादीवरुन भूषण सुपेकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 188 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 115/117 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक एन.बी.टिपरे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post