file photo वेब टीम : नागपूर पक्षात जास्त काड्या करणारे लोक नकोत, असे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भाज...
file photo |
वेब टीम : नागपूर
पक्षात जास्त काड्या करणारे लोक नकोत, असे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भाजपाचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सत्कार समारंभ आज शनिवारी नागपुरात झाला.
आनंदराव ठवरे हे जनसंघाच्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते असून, त्यांचा आज भाजपाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या समारंभात बोलताना गडकरी यांनी सदर वक्तव्य केले.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “इकडून-तिकडे जाणारे, गटबाजी करणारे लोक पक्षात नकोत. पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील; मात्र, ते निष्ठावंत असले पाहिजेत.
पक्षाला सूज आणणारे कार्यकर्ते नको आहेत.” यावेळी गडकरींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी म्हणाले, १९७४मध्ये भाजपाचे गंगाधरराव फडणवीस उपमहापौर झाले.
त्यावेळी इतका आनंद झाला होता की, आपल्या पक्षाचा पंतप्रधानच झाला! आता माहीत झाले की, उपमहापौर यांना काहीही अधिकार नसतात; मात्र पहिले पद मिळाल्याने आम्ही खूप नाचलो होतो. आनंदराव ठवरे हे पायरीचे दगड आहेत. त्यांच्या परिश्रमातून पक्ष आज एवढा मोठा झाला आहे.
COMMENTS