वेब टीम : मुंबई राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे...
वेब टीम : मुंबई
राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. ज्या क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल, तिथल्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधिकार्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन तसंच विक्री करणार्यांवर कारवाई करण्यासंदर्भात, उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. त्यासाठी अधिकार्यांना प्रोत्साहन द्यावे. गुटखा विक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबर्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला निधी वाढवून देण्याचंही त्यांनी मान्य केलं. गुटखाबंदीबाबत जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
COMMENTS