... तर तुम्ही या महाराष्ट्राचे राजकारण करण्यास नालायक आहात : राऊत


वेब टीम : मुंबई
मुंबईत प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC हे गांधीनगरला हलवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

या निर्णयावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले असून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.

“महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत असताना विरोधी पक्ष जे बोलत आहे, आश्चर्यकारक आहे. ” असे म्हणत राऊत यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला.

मुंबईत प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राविषयी भाजपा नेत्यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली .

“महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्यांचे वित्तीय सेवा केंद्रासंदर्भातील बोलणे आश्चर्यकारक आहे.

खरं तर अशा प्रश्नावर विरोधी पक्षाला सरकारला धारेवर धरण्याची संधी असते; पण या सगळ्या प्रकरणाशी उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही.

कारण ते आता सत्तेत आले. हा निर्णय आधीचा आहे. मात्र, विरोधी पक्षनेता जो असतो, त्याने महाराष्ट्राच्या बाजूने रान उठवायला हवे.

त्याने सरकारवर तोफ डागली पाहिजे. सरकार आमचे असले तरी मी हे म्हणतोय. आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र मुख्यमंत्र्यांनी जाऊ कसे दिले ?

पण इथं वेगळंच आहे. राज्याच्या इतिहासात मला प्रथमच असा विरोधी पक्ष दिसतोय, जो कुठल्याही प्रश्नावर महाराष्ट्राची बाजूच घेत नाहीये.

तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या नेत्यांची बाजू घेत आहे. नरेंद्र मोदी आमचेही नेते आहेत.

देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक भांडण असूच शकत नाही; पण हा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रश्न आहे.

अधिकाराचा, अस्मितेचा प्रश्न आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष, त्यांचे नेते पाच वर्षे मुख्यमंत्री होते. यासाठी त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे.

तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, त्यांनी महाराष्ट्रावर हा अन्याय होतोय म्हणून आवाज तरी उठवला पाहिजे.

जर हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असे कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचे राजकारण करण्यास नालायक आहात.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post