जिल्हाधिकाऱयांचा आदेश : उद्यापासून नगरमध्ये 'हे' चालू, 'हे' बंद


वेब टीम : अहमदनगर
कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही प्रमाणात शिथिलता आणलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अहमदनगर जिल्हयात काय सुरु राहील आणि काय बंद राहील याबाबतची अधिसूचना मंगळवारी (दि.30) दुपारी नव्याने जारी केली आहे. ही अधिसूचना बुधवारी (दि.1) पहाटे पासून लागू होणार आहे.

अशी आहे जिल्हाधिकारी यांची अधिसूचना – ज्याअर्थी, राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोना (कोव्हीड 19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याकारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे.

ज्याअर्थी, राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात मिशन बिगिन अगेन संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यास्तव अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी लॉकडाऊन संदर्भात सुधारीत मार्गदर्शक सुचनांसह प्रतिबंधात्मक आदेश दि.31 जुलै रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत लागू करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन, मी राहुल द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी अहमदनगर, मला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन, अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशान्वये दि.01/07/2020 रोजी 00.00 पासून ते दि.31/07/2020 रोजीचे मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.

शैक्षणिक संस्थाचे (विद्यापीठ/कॉलेज/शाळा) कार्यालय/कर्मचारी हे केवळ ई-सामग्री तयार करणे, उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे हे कामकाज करु शकतात. कोचींग क्लासेस बंद राहतील. तथापी ऑनलाईन/ दुरस्थः शिकवणी यास परवानगी राहील.

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतुक व्यतिरिक्त सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.  स्वतंत्र आदेश आणि एसओपीव्दारे अनुमती दिलेल्या व्यतिरिक्त रेल्वे प्रवासी वाहतूक व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.

सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील.  सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्यादीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील.  सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट व आदरातिथ्य सेवा बंद राहतील.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर/ फिरण्यावर रात्री 9.00 तेसकाळी 5.00 या कालावधीत निर्बंध राहील.  65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.

अहमदनगर जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोन वगळता वरील प्रमाणे प्रतिबंधीत केलेल्या व्यवहार/कृती/क्रिया व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहार/कृती/क्रिया साठी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. परवानगी दिलेल्या व्यवहार/कृती/क्रिया कोणत्याही शासकीय प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. क्रीडासंकुले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी खुले ठेवण्याची परवानगी असेल. तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही. बंदिस्त स्टेडियम मध्ये कोणत्याही क्रिडाविषयक बाबींना परवानगी असणार नाही. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार/कृती/क्रिया साठी सामाजिक अंतराच्या (सोशल डिस्टन्स)निकषांचे पालन बंधनकारक राहील.

सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी असेल.

1) दुचाकी – 1 स्वार

2) तीन चाकी – 1 + 2

3) चार चाकी – 1 + 2

जिल्हांतर्गत बस सेवेस जास्तीत-जास्त 50 % क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.

सर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी 9.00 ते सायं.5.00 याकालावधीत खुली राहतील. तथापी बाजारपेठा / दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास स्थानिक प्रशासन त्वरीत अशा बाजारपेठा/ दुकाने बंद करण्याची कार्यवाही करतील.

पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील.

वृत्तपत्रांची छपाई व व्दार वितरणास (शारिरीक अंतराचे बंधन, मास्क व सॅनिटायझर वापरणे सह )परवानगी राहील.

कटिंग सलून आणि ब्युटीपार्लर खालील अटींवर सुरु राहतील.

1. केवळ कटिंग, डाईंग, वॅक्सींग व थ्रेडींग इत्यादीला परवानगी राहील. त्वचेशी संबंधीत सेवांना परवानगी असणार नाही हे दुकानाचे दर्शनी भागामध्ये स्पष्टपणे दर्शविले जावे. 2. कर्मचा-यांना ग्लोव्हज्, एप्रन व मास्क वापरणे बंधनकारक राहील. 3. प्रत्येक सेवेनंतर सर्व कार्यक्षेत्र (खुर्चीचे) स्वच्छ करावे. सामुहिक वापरात येणारे पृष्ठभाग व फ्लोरिंगची दर दोन तासांनी स्वच्छता करावी. 4. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन्सचा वापर करणे बंधनकारक राहील. प्रत्येक सेवेनंतर नॉनडिस्पोजेबल उपकरणांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. 5. ग्राहकांमध्ये शारिरीक अंतराचे चे पालन करावे. तसेच 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही. मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. 6. उपरोक्त प्रमाणे घ्यावयाची दक्षता सर्व ग्राहकांचे निदर्शनास आणून द्यावी.

काही विशिष्ट प्रकरणात व्यक्ती व वस्तूंची हालचाल सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट दिशानिर्देशांनुसार खालील मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.  सर्व प्राधिकरणांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता वैद्यकीय व्यवसायिक, परिचारीका, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांच्या राज्यांतर्गत व आंतरराज्य हालचालीस परवानगी परवानगी द्यावी.

व्यक्तींच्या आंतरराज्यीय व आंतरजिल्हा हालचाली तसेच अडकलेले मजूर, स्थलांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, यांच्या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्यात याव्यात. श्रमिक विशेष रेल्वेव्दारे आणि समुद्री प्रवास करणा-या व्यक्तींच्या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्यात याव्यात.

देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरिक आणि परदेशी जाण्यासाठी विशिष्ट व्यक्तींचे, परदेशी नागरिकांचे व भारतीय समुद्री प्रवाशांचे येणे व जाणे एसओपीनुसार नियमित करण्यात यावे.  सर्व प्राधिकरणांनी सर्व प्रकारच्या आंतरराज्यीय वस्तू/मालवाहतुक व रिकाम्या ट्रक यांचे वाहतुकीस परवानगी द्यावी.

अहमदनगर जिल्हामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कामाचे ठिकाणी कोव्हीड19 चे व्यवस्थापनाचे दृष्टीने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.  सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाचे ठिकाणी आणि प्रवासा दरम्यान मास्क वापरणे अनिवार्य आहे.  सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवावे.  दुकानांचे ठिकाणी ग्राहकांमध्ये शारिरीक अंतराचे (सोशल डिस्टन्स) चे पालन करावे आणि 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.

विवाह समारंभात सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्स) पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल. (खुली जागा, लॉन्स, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/ हॉल/सभागृह, घर व घराचे परिसरात )

अंत्यविधीस सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्स) पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

सार्वजनिक ठिकाणी थुकणा-यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी.  सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.  शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्तव कामांच्या व व्यवसायांच्या वेळांचे नियोजन करावे.  कामाचे ठिकाणी आत येण्याचे व बाहेर जाण्याचे मार्ग तसेच सामाईक मोकळ्या जागांचे ठिकाणी थर्मल स्कॅनर, हॅण्ड वॉश व सॅनिटायझर्स पुरविण्यात यावे.  कामाचे ठिकाणी, सुविधा केंद्राचे ठिकाणी सर्वसामान्यपणे वेळोवेळी हाताळण्यात येणारे भाग/वस्तू (उदा.दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट स्वीच, विजेची बटणे इ.) यांचे वेळोवेळी / शिफ्टचे दरम्यान निर्जंतुकीकरण करण्यात यावे.  कामांचे ठिकाणांचे सर्व प्रभारी यांनी त्याठिकाणी कामगार / कर्मचारी यांचेमध्ये योग्य अंतरासह तसेच शिफ्ट दरम्यान व जेवणाची वेळ या दरम्यान योग्य अंतर ठेवुन सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्स) पालन करावे.

कोणतीही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post