शेवाळेंचा स्मृतीभ्रंश, राम शिंदेंवरील आरोप बिनबुडाचे : पोटे


DNALive24 : नगर

भाजपाची सुरू असलेली घौडदौड पाहता विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेक जण  आपली पोळी भाजून घ्यायला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तथाकथित कर्जतचे पुढारी म्हणून उदयास येऊ लागले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या वडिलांच्या नावावर असलेला बंगला हा अधिकृत बांधला असून त्याबाबतचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असताना सुध्दा कॉंग्रेसचे कैलास शेवाळे हे स्मृतीभ्रंश झाल्यासारखे बिनबुडाचे आरोप करत आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.युवराज पोटे यांनी शेवाळे यांच्यावर निषाणा साधला आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांचेवर ऍड.शेवाळे यांनी टीका केली होती. या टीकेला ऍड.पोटे यांनी उत्तर दिले आहे. पोटे यांनी म्हटले आहे की, देशामध्ये भाजपाची सरशी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. बिनबुडाचे आरोप करण्याची त्यांची जुनी सवय असून भाजपचा चढता आलेख त्यांना देखवत नाही. स्मृतीभ्रंश झाल्यासारखे ते आता भाजपवर टीका करु लागले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यामध्ये केलेली अनेक विकासकामे पाहता विरोधकांकडे आता कोणतेच मुद्दे राहिले नसल्यामुळे त्यांनी आता पालकमंत्र्यावर अथवा त्यांच्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच त्यांना बालिशपणा आता उघड झाला आहे.

राम शिंदे यांनी चौंडी येथे बांधलेला बंगला हा वास्तविक पाहता त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. बांधकाम करताना शासकीय पातळीवर ग्रामपंचायत ना हरकत दाखला, ब्ल्यू प्रिंट, लेआऊट व नगररचना यांची रेखांकन मंजुरी, बांधकाम परवानगी झेरॉक्स प्रत, बिनशेती वाणिज्य कारणास्तव अकृषिक परवानगी इत्यादी कागदपत्रे व तलाठी रिपोर्ट यांचा अहवाल पाहता बांधकाम पूर्ण केल्याचे दिसून येते, असे नमूद करुन बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. वास्तविक पाहता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला दि.८/०२/२०१८ रोजी संबंधित जामखेडचे तहसिलदार यांच्याकडून घेतला आहे. हा दाखला शंकर बापू शिंदे यांचे नावाने आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांचा कोणताच संबंध येत नसला तरी मात्र विरोधक आता बिनबुडाचे आरोप करुन अतिक्रमण केले असल्याचे म्हणत आहेत. हे साफ चुकीचे आहे. त्या-त्या वेळेला पाहणी करुन तसे अहवालही प्रशासनाने दिले असताना विरोधकांना आता अतिक्रमण केल्याचा जावईशोध कसा लागला? असा सवालही पोटे यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post