अहमदनगर दि.१९ - जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपा...
अहमदनगर दि.१९ - जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते.
स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते हे संस्थेसाठी झटणाऱ्या स्व.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे विद्यापीठाचे कार्य इतरांना मार्गदर्शक आहे.
वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचे संस्थेचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यापीठात देण्यात येते. सेवाभावनेने काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णावर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल म्हणाले.