कोपरगावात विधानसभेला काळे-कोल्हेंची वाट यंदा बिकट; दोघात तिसरा मैदानात?


वेब टीम : अहमदनगर
पिढ्या न पिढ्या कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या काळे-कोल्हे यांच्या सोईच्या राजकारणाला यंदाच्या विधानसभेत जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. आलटून-पालटून आमदारकी उपभोगणाऱ्या काळे व कोल्हे या दोन कुटुंबीयांच्या राजकारणाला पर्याय म्हणून तिसरा सक्षम उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरणार असून, काळे व कोल्हेंची विधानसभेची वाट यंदा बिकट होण्याची चिन्हे आहेत.

आमदार होण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील अनेकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्या दृष्टीने नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे यांनीही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्यांनी तालुक्यातील 42 गावे पिंजून काढली असून, अपक्ष उमेदवार म्हणून स्वतःचा प्रचार सुरु केला आहे .

मध्यंतरी नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीत अपक्ष विजय वहाडणे हे तब्बल 9 हजार मतांनी निवडून आले. वहाडणे यांनी कोल्हे यांच्यावर सतत टीकास्त्र सोडले. आमदार स्नेहलता कोल्हे पालिकेत हस्तक्षेप करीत मला काम करू देत नसल्याचे वहाडणे यांनी सतत ओरड केली. त्यामुळे वहाडणे यांनी देखील आमदारकीसाठी उभे राहावयाचे ठरवले आहे.

वहाडणे सध्या भाजपातून निलंबित आहेत. मात्र भाजप आपल्या रक्तात असल्याचे नेहमी सांगतात. मुख्यमंत्री फडणवीस पासून अनेक मंत्र्यापर्यंत आपले संबध असल्याचे ते बोलतात. सध्या वहाडणे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले असून कार्यकर्त्यासह गाठीभेटी सुरु केल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 42 गावातून विविध लोकांशी चर्चा करून सुप्त प्रचार चालू केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates