नगर जिल्हा पुन्हा हादरला; शिर्डीत तिघांची कोयत्याने गळे कापून हत्या


वेब टीम : अहमदनगर
शिर्डी जवळील निमगाव शिवारातील वस्तीवर शनिवारी (दि.13) सकाळी एकाने एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शेजारी राहणाऱ्यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकुर कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शेजारीच राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याने केला आहे. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.

अर्जुन पन्हाळे याने ठाकूर पती पत्नींचे कोयत्याने गळे कापले. यावेळी त्यांची १६ वर्षाची मुलगी शाळेत जाण्यासाठी आवराआवर करत होती. त्याने तिचीही कोयत्याने हत्या केली. अर्जुन पन्हाळे याने केलेल्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर व याच कुटुंबातील आणखी एक मुलगी जखमी झाली असून या कुटुंबातील एक ६ वर्षाची मुलगी बचावली असून त्यांच्यावर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तेथे सर्वत्र रक्ताचा सडा आढळून येत आहे. पोलिसांनी शेजारच्या घरात राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याला ताब्यात घेतले आहे. केवळ किरकोळ वादातून त्याने हे हत्याकांड केल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारची माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली असून लोकांची या वस्तीवर गर्दी होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post