वेब टीम : शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ ते बुधवार द...
वेब टीम : शिर्डी
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ ते बुधवार दिनांक १७ जुलै २०१९ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी १६ जुलै रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारती नंतर समाधी मंदिर बंद राहाणार असून कलाकार हजेरी कार्यक्रम होणार नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
श्री.मुगळीकर म्हणाले, गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या हयातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून उत्सवाच्या प्रथम दिवशी सोमवार दिनांक १५ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत श्रीमती अश्विनी जोशी, नासिक यांचा भजन संध्या कार्यक्रम, रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत पं.राजा काळे, पुणे यांचा अभंग कार्यक्रम, रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. तसेच या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे रात्रौ १२.०० वाजता शेजारती नंतर समाधी मंदिर बंद होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी बुधवार दिनांक १७ जुलै पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.गंगाधरबुवा व्यास, डोंबवली (मुंबई) यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत श्री.मदन चौहान, रायपूर यांचा भजन संध्या कार्यक्रम होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दिनांक १४ जुलै २०१९ रोजी दुपारी १.०० ते सायंकाळी ६.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील देणगी काऊंटर नंबर ०१ वर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता चिठ्ठ्या काढून निश्चित करण्यात येतील. तसेच दिनांक १४ जुलै रोजी मुख्य दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होणार नाही, याची साईभक्तांनी नोंद घ्यावी, असे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
COMMENTS