घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा व १०० कोटी दंड


वेब टीम : जळगाव
बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजीमंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय सर्व दोषींची शिक्षा जाहीर करण्यात आली. त्यामध्ये  सुरेश जैन यांना ७ वर्षाची शिक्षा, १०० कोटींचा दंड. गुलाबराव देवकरांना ५ वर्षांची शिक्षा, ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना, तुम्हाला काही मांडायचे आहे का, असे विचारले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही, ते आता वयोवृद्ध आहेत असेच म्हणत जोरदार युक्तीवाद केला. आरोपींना विविध व्याधी आहेत म्हणून त्यांना न्यायालयाने माफी द्यावी, असा बचावात्मक पवित्रा त्यांच्या वकिलाने घेतला. यावर आरोपी असलेल्या सर्व नगरसेवकांनी कट-कारस्थान करून हा गुन्हा संगनमताने केला असे सरकारी वकिलाने कोर्टापुढे मांडले. नगरसेवकांनी जागा नसताना घरकुलाचा ठराव का केला, तसेच आजवर याप्रकरणी ताब्यात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या व्याधी नाहीत, लोकांचा पैसा असल्याने लोकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे होता, असे प्रभावी मुद्दे मांजले. या प्रकरणामुळे लोकांच्या पैशाचा अपव्यय झाला असून यातील सर्व आरोपींना शिक्षा देण्यात यावी असे सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी मांडले. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह 52 आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व 48 संशयित आरोपी हजर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post