वेब टीम : अहमदनगर भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०१८ अहमदनगर येथील श्री समर्...
वेब टीम : अहमदनगर
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०१८ अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला ,सावेडी, माध्यमिक विभागाचे शिक्षक डॉ. अमोल सुभाष बागुल यांना जाहीर झाला आहे. विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत कमी वयात
पुरस्कार प्राप्त करणारे अमोल बागुल महाराष्ट्रात एकमेव तर देशात गुणानुक्रमाने पहिले ठरले आहेत.रजत पदक,मानपत्र व पन्नास हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून त्यातील ३५००० रुपये महापूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये व सुमारे १५००० रुपये नगर प्रेस क्लबच्या विविधांगी विधायक उपक्रमांसाठी डॉ.बागुल प्रदान करणार आहेत.
गुरुवार दि. ५ सप्टेंबर २०१९ या राष्ट्रीय शिक्षक दिनी विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या शुभहस्ते शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारत सरकार गृहमंत्रालयाच्या जनगणना २०११ मधील उत्कृष्ट कामाबद्दल जनगणना राष्ट्रपती पदक, धरमपुरी-निंबलक रेल्वे गेटवर प्रसंगावधान राखून रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी मोलाचा सहभाग, महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून मनोधैर्य योजना समिती सदस्य म्हणून अत्याचारित महिलांमुलींसाठी लाखो रुपयांची मदत,मानसिक समुपदेशन व प्रशिक्षण, हरवलेल्या मुलांना शोधून पालकांकडे सुपूर्द केले, विद्यार्थी व कलामार्गदर्शकाला आजीवन सीसीआरटी शिष्यवृत्ती, गणेशोत्सव-नवरात्रीत अनाथ मुले घरात सांभाळली, चाळीस मुले दत्तक घेतली ,वाढदिवसानिमित्त २२दुष्काळग्रस्त गावांना पाणी वाटप,एकाच शैक्षणिक वर्षात सुमारे २७६ विविध उपक्रम राबवले."झिरो स्कूल बॅग पॅटर्न", स्टुडन्ट आयडी कार्ड फोन, कोड आयडी कार्ड, "समर्थ ई क्लास"चे ११४ आयसीटी गॅजेट्स, २२शैक्षणिक अँपची निर्मिती,आरसा वही ,नासा किड्स क्लब, सायन्स टॉईज बँक, रंग मूल्यांकन पद्धती, ओपन पेपर डे, अभ्यासक्रमातील कवितांचे जागतिक मराठी भाषादिनी ७७ सार्वजनिक ठिकाणी गायन, रंगसमर्थ जागतिक उपक्रम, १७७ जागतिक विश्वविक्रमात सहभाग, समर्थकन्यांचे बक्षीस घर, "महाराष्ट्र देशा -दगडांच्या देशा"-गारगोटी प्रदर्शन, सिनेमा-लघुपट मालिकांतील विद्यार्थ्यांच्या भूमिका, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा ,पाच बोटांपासून सप्तसूरांपर्यंत संस्कार उपक्रम, संडे आर्ट स्कूल ,घरीच शैक्षणिक साहित्याची खोली,५७ ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता,स्वच्छतादूत, मतदारदूत, एड्स व्हाट्सअपदूत म्हणून कार्य, हनिबेल स्पेस अकॅडमी,अमेरिका कॅम्पसाठी व नासा स्पेस कॅम्पसाठी निवड, वर्ल्ड टीचर फोरमच्या स्थापनेच्या माध्यमातून १२१ देशातील सुमारे ५००० शिक्षकांच्या शैक्षणिक नवसंकल्पना आदानप्रदानासाठी प्रयत्न,९पुस्तकांंचे लेखन,२२ देशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, २०० पेक्षा जास्त प्रशिक्षणे, ५० पेक्षा जास्त कोर्सेस आदीं घटकांचा गौरव जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांनी केला.
डॉ.अमोल बागुल यांच्या या राष्ट्रीय यशामध्ये सुवर्णमहोत्सवी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ, नगर प्रेस क्लब, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था, नगर,अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक दिलीप गोरे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे आदी मान्यवरांचा मोलाचा सहभाग व मार्गदर्शन आहे.
COMMENTS