सेना - भाजपच्या यात्रेप्रमाणे आता राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा


वेब टीम : पुणे
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंची जनआशिर्वाद यात्रा राज्यभर सुरू झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेस गुरूवारपासून सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आता यात्रा काढण्याचे ठरविले आहे. शिवस्वराज्य यात्रा असे या यात्रेचे नाव असून ही यात्रा येत्या 6 ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ जुन्नरपासून सुरू होणार आहे.

एकामागोमाग नेते पक्ष सोडून जात असल्याने मनोबल खच्ची झालेल्या  कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी ही यात्रा काढली जाणार आहे. अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघणार्‍या या यात्रेचे स्टार प्रचारक सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे असतील. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असून महत्वाचे नेते भाजपात जात आहेत. ही गळती थांबवली नाही, तर पक्षाचे अस्तित्वच संपेल अशी भीती वाटणार्‍या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठीच ही यात्रा असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचा मुख्य आधार असलेला मराठा समाज आता पक्षापासून दुरावला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्यानंतर मराठा युवक भाजपाकडे आकर्षित होऊ लागला आहे. या मराठा समाजाला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी ही यात्रा असेल. तिचा समारोप सिंदखेडराजा येथे होणार आहे.रोज तीन विधानसभा मतदारसंघातून ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. येत्या 16 ऑगस्टला यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होणार असून त्याची सांगता रायगडावर होईल. या संपूर्ण यात्रेची जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post