वाचा 'ॲशेस’ क्रिकेट मालिकेचा आजच्या दिवशी कसा झाला जन्म


वेब टीम : मेलबर्न
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या ॲशेस सिरीजला सुरुवात होण्यामागे आजच्याच दिवशी घडलेली एक घटना कारणीभूत होती. २९ ऑगस्ट १८८२ रोजी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघात ‘द ओव्हल’ मैदानावर सामना सुरु होता.

कसोटी सामन्याचा तो दुसराच दिवस होता. दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर माफक ८५ धावांचे आव्हान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडला केवळ ७७ धावाच करता आल्या.

आपल्या मायदेशात इंग्लंड पहिल्यांदाच पराभूत झाला. या निराशादायक पराभवामुळे साहजिकच इंग्लंड संघाला चाहत्यांचा व माध्यमांचा रोष पत्करावा लागला.

दोन दिवसांनंतर ३१ ऑगस्टला ‘क्रिकेट- द विकली रेकॉर्ड ऑफ द गेम’ या चार्ल्स अलकॉक संपादित साप्ताहिकात इंग्लंड क्रिकेटची थट्टा करणारे शब्द छापुन आले होते. क्रिकेटच्या मैदानावरील इंग्लंडच्या वर्चस्वाचा ओव्हल मैदानावर मृत्यू झाला आहे. अशा आशयाचे ते शब्द होते.


त्यानंतर २ सप्टेंबरला ‘द स्पोर्टींग टाइम्स’ या साप्ताहिकात ब्रिटिश पत्रकार ‘रेजिनाल्ड ब्रुक्स’ यांनीही इंग्लंड क्रिकेटला श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर इंग्लंडचे कर्णधार इव्हो ब्लिग यांनी १८८२-८३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘ॲशेस’ परत मिळवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वर्षे हा शब्द क्रिकेटविश्वात दिसला नाही.

१९०३ मध्ये इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी इंग्लिश कर्णधार प्लेगहॅम वॉर्नरने ब्लिग प्रमाणेच ‘ॲशेस’ परत मिळवण्याची गर्जना केली.

यावेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी ते उचलुन धरले आणि इंग्लंड ऑस्ट्रेलिया मालिकेला ‘ॲशेस’ हा शब्द कायमचा चिकटला.

आत्तापर्यंत झालेल्या ३३० ॲशेस सामन्यांपैकी १३४ सामने ऑस्ट्रेलियाने तर १०६ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.

इंग्लंडने एकूण ३२ तर ऑस्ट्रेलियाने ३३ मालिका जिंकल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या मालिकेतले पहिले तीन सामने पार पडले असून दोन्ही संघात सध्या १-१ अशी बरोबरी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post