वेब टीम : अहमदनगर नगर शहरासह उपनगरात सध्या डेंग्युच्या साथीने थैमान घातले असून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर डेंग्युबाधित रुग्ण...
वेब टीम : अहमदनगर
नगर शहरासह उपनगरात सध्या डेंग्युच्या साथीने थैमान घातले असून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर डेंग्युबाधित रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे मात्र चुकीची माहिती देऊन सर्वांचीच दिशाभुल करीत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी मंगळवारी (दि.३) दुपारी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना घेराव घालत जाब विचारला.
शहरातील वैदुवाडी येथील रहिवाशी व महापालिकेचा कंत्राटी कामगार बाबाजी शिंदे याचा मागील आठवड्यात डेंग्युची लागण झाल्याने मृत्यू झाला होता त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांनी मयत बाबाजी हा देवदर्शनाला गेला होता तिकडे त्याला ही लागण झाली असेल अशी माहिती प्रसारमाध्यमांसह प्रशासनालाही दिली होती. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून वैदुवाडी परिसरात किमान ५०-६० जण साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यातील सहा जणांना डेंग्युची लागण झालेली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे डॉ.बोरगे सर्वांचीच दिशाभुल करत असल्याचा आरोप करत वैवाडी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.३) दुपारी महापालिकेत येवून आयुक्त भालसिंग यांना घेराव घालत जाब विचारला तसेच डेंग्युची लागण झाल्याचे अहवालच त्यांच्यासमोर मांडले. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, विनित पाऊलबुधे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, अजिंक्य बोरकर, तायगा शिंदे, जालिंदर शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी अनेक नागरिकांनी फक्त वैवाडीच नव्हे तर शहराच्या विविध भागात डेंग्युची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावली असून अनेक रुग्ण डेंग्युने बाधित झालेले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती यावेळी आयुक्तांना दिली. साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप करीत डॉ.बोरगे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली.
COMMENTS