वेब टीम : कोलकाता भारतीय क्रिकेटमधील लाचलुचपतसारखे प्रकार हाताळण्यासाठी मॅच फिक्सिंग संबंधी कायदा तसेच सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण...
वेब टीम : कोलकाता
भारतीय क्रिकेटमधील लाचलुचपतसारखे प्रकार हाताळण्यासाठी मॅच फिक्सिंग संबंधी कायदा तसेच सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याचे पर्याय बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख अजित सिंग शेखावत यांनी सुचवले आहेत..
अलीकडेच झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सॲपद्वारे आमच्याशी संपर्क साधला होता, अशी माहिती काही खेळाडंूनी बीसीसीआयला कळवली. पाठोपाठ महिला विश्वचषक स्पर्धेदरम्यानही एका महिला खेळाडूशी एका व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या बारा खेळाडूंनी गैरव्यवहारांसंबंधी आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचे बीसीसीआयला कळवले होते. एप्रिल २०१८ साली बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अजित सिंग शेखावत हे राजस्थानमध्ये पोलीस महासंचालक होते.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई ट्वेण्टी-२० लीगमध्येही असेच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. मॅच फिक्सिंगचे प्रकार रोखता येणार नाहीत, पण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅच फिक्सिंग प्रकरणी कायदा करण्याची गरज आहे, असे अजित सिंग शेखावत यांना वाटते.त्यांच्या मते यासंबंधी जर योग्य तो कायदा करण्यात आला तर पोलिसांनाही याप्रकरणी कारवाई करण्यास योग्य ती दिशा मिळू शकेल.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे मॅच फिक्सिंग हा कायदेशीर गुन्हा म्हणून घोषित करण्याची गरज असल्याचे विधी आयोगाने गतवर्षी सुचवले होते. खेळांमधील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी, असे अजित सिंगना वाटते.
यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळेल, असे अजित सिंग म्हणतात. अजित सिंगनी निदर्शनास आणून दिले, पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आर्थिक भ्रष्टाचाराचे प्रकार आधीपासूनच सुरू आहेत. आता त्यात महिला क्रिकेटची भर पडली आहे.
सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिली तर त्यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी अजित सिंग म्हणाले, कायदेशीर मान्यता दिल्यामुळे कोण किती रकमेचा सट्टा खेळत आहे याची कल्पना येईल. त्यामुळे बेकायदेशीर सट्टेबाजीला आळा बसू शकेल.