वेब टीम : पुणे विरोधी पक्षांमधले नेते एकतर जेलमध्ये नाहीतर चौकशीच्या घेऱ्यात. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संगीत खुर्ची केली. आप...
वेब टीम : पुणे
विरोधी पक्षांमधले नेते एकतर जेलमध्ये नाहीतर चौकशीच्या घेऱ्यात. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संगीत खुर्ची केली. आपण पाच वर्षे भक्कम मुख्यमंत्री दिला. तुम्ही राष्ट्रभक्तांबरोबर काम करत आहात हे तुमचे भाग्य आहे, असे सांगत लोक आपले ऐकत आहेत.
त्यांना सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार आणण्याचे आवाहन त्यांना करा, असा आदेश भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा सोमवारी (ता. 23) पुण्यात झाला. त्यांच्यासमोर नड्डा बोलत होते.
राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश, राज्यमंत्री संजय भेगडे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, अमर साबळे तसेच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानसभेच्या प्रचाराचे शिंग फुंकताना नड्डा यांनी ३७० कलम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती केली.
देशात 2 हजार 300 राजकीय पक्ष आहेत. त्यात 59 प्रादेशिक आणि 7 राष्ट्रीय आहेत. या गर्दीत फक्त भाजपा प्रजातांत्रिक पक्ष आहे. बाकी सगळे पक्ष पारिवारिक, चाचा-भतिजा पार्टी आहेत.
भाजप खऱ्या अर्थाने लोकशाही पक्ष आहे. या पक्षात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरलेला आहे, असे नड्डा म्हणाले.
COMMENTS