दाम दुप्पटचे आमिष दाखवून ८१ लाखांची फसवणूक


वेब टीम : अहमदनगर
अल्पावधीत दाम दुप्पट होतील, त्याचबरोबर तुम्हाला मेडिक्लेम सुविधा मिळेल, असे आमिष दाखवुन ग्राहकांची 81 लाख 29 हजार 387 रूपयांची फसवणुक केल्याची घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली असुन ही घटना 28 ऑगस्ट 2009 ते 2016 दरम्यान घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुभाष कचरू भुजबळ (वय 65, रा. पारेगाव रस्ता, गोविंदपुर, ता. येवला, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नंदलाल केशर सिंग, जोसेफ लाझार (दोघे रा. सी.टी.क्र.359, सी, सुहास टेरेस मागे, पन्नालाल घोष मार्ग, लिंक रोड, भंडारवाडा, मालाड (प.) मुंबई), नितीन रावसाहेब हासे (झोनल मार्केटिंग मॅनेजर, रा. चिखली, संगमनेर), बापु प्रभाकर माने (झोनल मॅनेजर, रा. नारायणगाव, जुन्नर, पुणे), राजेंद्र सुर्यभान उपाध्ये (सेल्स मॅनेजर, गारपीरमळा, चिखली, संगमनेर), नितीन बाळासाहेब पोखरकर (सेल्स मॅनेजर, रा. जुन्नर, पुणे), रामनाथ रंगनाथ गोडगे (ज्यु. सेल्समन, रा. अकोले रोड, संगमनेर) अशा 7 जणांनी फसवणुक केल्याची फिर्यादी म्हटले आहे.

या सात जणांनी 296 सभासदांच्या नावे 81 लाख 29 हजार 387 रूपयांच्या ठेवी आमिष दाखवत स्विकारल्या होत्या. फिनॉमीनल हेल्थ केअर सर्व्हिसेस लि. मुंबई या कंपनीचे कार्यालय संगमनेमध्ये वाघ हाऊस, नवीन नगर रस्ता या ठिकाणी सुरू केले होते. गुंतवणुकदारांना कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम तसेच विमा सुविधा असे आश्‍वासन दिले.

मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणुकदारांनी पैसे परत मागितले असता हा पैसे परत न मिळाल्याने ग्राहकांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी तशी फिर्याद संगमनेर पोलिसात दाखल केली.

या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी सुभाष भुजबळ यांच्या फिर्यादीवरून भादंविक 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post