लातूरमध्ये अमित देशमुख अस्तित्व टिकविणार की निलंगेकरांचे प्रस्थ वाढणार?


वेब टीम : लातूर
लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख आमदार असून त्यांच्याविरुद्ध भाजपतर्फे शैलेश लाहोटी,प्रेरणा होंडराव अशी इच्छुकांची नावे आहेत. मात्र देशमुख यांना भारी ठरेल असा उमेदवार भाजपकडे दिसत नाही.

लातूर ग्रामीणमध्ये सध्या काँग्रेसचे त्र्यंबक भिसे आमदार आहेत. यावेळी भिसे यांच्याबरोबरच अमित देशमुख यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य धीरज देशमुख हे इच्छुक आहेत.

भाजपतर्फे 2009 ते 2014 मध्ये पराभव पत्करावे लागलेले रमेश कराड दावेदार आहेत.  एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांचे पुतणे असून वंजारी समाजाचे आहेत.


अहमदपूरमध्ये 2014 ला अपक्ष निवडून आलेले विनायक पाटील यावेळी भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास नक्की आहे. गेल्यावेळी कमी मतांनी पराभूत झालेले आणि गेली अनेक वर्षे राज्यस्तरावर पक्षसंघटनेत काम करीत असलेले गणेश हाके तसेच अशोक केंद्रे हेही इच्छुक आहेत.

सगळ्यात उत्सुकता असेल औसा मतदार संघातील लढतीची. मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार याठिकाणी भाजपाचे उमेदवार असतील हे जवळपास नक्की आहे.विद्यमान आमदार काँग्रेसचे बसवराज पाटील विरुद्ध अभिमन्यू असा संघर्ष या ठिकाणी बघायला मिळेल.

बसवराज हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आहेत. पवार यांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांची ताकद असेल. अभिमन्यू यांनी गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे या मतदार संघात खेचून आणली त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल.

जातीय समीकरणे कोणाच्या बाजू वळतात हेदेखील महत्त्वाचे असेल. काँग्रेसतर्फे मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगी हेही इच्छुक असून  त्यांनी उमेदवारीसाठी दिल्ली गाठली आहे.

 पालकमंत्री निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात सध्या टोकाचा संघर्ष दिसतो त्याचा फटका आपल्याला बसणार नाही याची काळजी अभिमन्यू यांना घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीचा दावा पुढे केला आहे पण तो दावा अभिमन्यू यांच्यासमोर टिकण्याची शक्यता नाही.

उदगीर या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात दोन वेळचे भाजप आमदार सुधाकर भालेराव पुन्हा लढतीसाठी सज्ज आहेत. पालकमंत्री निलंगेकर आणि त्यांच्यातून विस्तव जात नाही. भालेराव यांची उमेदवारी कापण्यासाठी निलंगेकर यांनी काही चेहरे समोर केले आहेत.

दुसरीकडे माजी खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे अश्वजीत हेही भाजपतर्फे इच्छुक आहेत. गेल्या वेळचे पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

निलंगा मतदारसंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) असा परंपरागत सामना पाहायला मिळेल.

लातूरचे राजकारण गेली काही वर्षे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे आमदार अमित देशमुख अशा वादाभोवती फिरत आहे.

या दोघांनी एकमेकांना शह देण्यासाठी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावले. त्यात बहुतांश वेळा निलंगेकर हेच भारी ठरले आहेत.

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा संघर्ष बघायला मिळणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post