वेब टीम : अहमदनगर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सभेनंतर दोन गट परस्पर भिडले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी प...
वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सभेनंतर दोन गट परस्पर भिडले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र काही ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवले. दरम्यान पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही गटाविरोधात फिर्याद दाखल केली. पो.कॉ.पवन लहारे यांनी फिर्याद दिली आहे.
माजी महापौर अभिषेक कळमकर, संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडेकर, सुरेश बनसोडे, तोसिफ शेख, संतोष ढाकणे, किरण काळे, जॉय लोखंडे यांच्या सह इतर 15 ते 20 जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नंदनवन लॉन येथे शनिवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या दोन गटात धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कोतवाली गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. दरम्यान दुसरा गटही तेथे आला होता. विद्यमान आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष माणिकराव विधाते तसेच काही नगरसेवकांनी येऊन अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची समजूत घातल्यानंतर सर्वजण गुन्हा न नोंदवता एकाच गाडीत बाहेर पडले होते. मात्र रात्री उशीरा पोलीस कॉन्स्टेबल पवन लहारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडेकर, सुरेश बनसोडे, तोसिफ शेख, संतोष ढाकणे, जय लोखंडे व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आपसात भांडण करून शिवीगाळ, दमदाटी करून पोलिसांसमोर झुंज केल्याबाबतचा गुन्हा नोंदवला आहे.