कोथरुडमधून चंद्रकांतदादांना पाडणार; ब्राह्मण महासंघाचा इशारा


वेब टीम : पुणे
पुणेकरांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत आठच्या आठ आमदार 'भाजपा'चे निवडून दिले होते. या वेळी मात्र सर्वात 'सेफ' मानल्या गेलेल्या कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रिंगणात उतरवण्याची 'खेळी' खेळली जात आहे. पण हा मतदारसंघ चंद्रकांतदादांसाठी 'डेंजर झोन' ठरू शकतो. मात्र या मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटिल यांचा पराभव करू, असा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.

कोथरूड हा 'युती'साठी नेहमीच 'सेफ' ठरला आहे. गेल्यावेळी भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले. त्यावेळी भाजपाच्या मेधा कुलकर्णी निवडून आल्या. पण आता चंद्रकांतदादा यांच्यासाठी हा मतदारसंघ 'तयार' करण्याची तयारी सुरू आहे.

पण दोन मुद्दे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता दिसत आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाकडे अनेक इच्छुक आणि पक्षनिष्ठ उमेदवार असतानाही 'बाहेरचा' उमेदवार नको, अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे या मतदारसंघात एक लाखापेक्षा जास्त ब्राह्मण मतदार आहेत. पण ब्राह्मण महासंघानेच चंद्रकांतदादांना विरोध दर्शवला आहे. .

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा हे सध्या आणि यापूर्वीही विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांनी मतदारांमधून निवडून यावे आणि नंतर विरोधकांवर टीका करावी, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण करीत असतात. त्यामुळे त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

ते मूळ कोल्हापूरचे आहेत, पण तेथे शिवसेनेचे चांगलेच प्राबल्य असल्याने त्यांच्यासाठी 'सेफ' अशा कोथरूड मतदारसंघाची निवड करण्यात आली. पण त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी विरोधी सूर निघू लागले आहेत. चंद्रकांतदादा हे उमेदवार असतील, तर आपण रिंगणात उतरू, असे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी जाहीर करून टाकले आहे. गेल्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा सुमारे ६४ हजार मतांनी पराभव केला होता.

'बाहेरचा' उमेदवार हा चंद्रकांतदादांच्या विरोधकांच्या हातातील मोठा मुद्दा आहे. त्यातच ब्राह्मण महासंघ आक्रमक झाल्याने त्यांच्या उमेदवारीच्या मार्गातील मोठा अडथळा ठरणार आहे. कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी आग्रही भूमिका महासंघाचे आनंद दवे यांनी घेतली आहे.

पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपाच्या बरोबर राहिला आहे. अशा परिस्थितीत लाल महालातील दादोजी कोंडदेव आणि संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचे पुतळे हलवण्यात आले. त्यावेळी त्यांना न्याय न देणारी पुण्याबाहेरील ब्राह्मणद्वेषी व्यक्ती जर पुण्यावर लादली गेली तर त्याला पुण्यातील ब्राह्मण समाज तीव्र विरोध करील, अशी जोरदार टीका दवे यांनी आपल्या पत्रकात केली आहे. गरज पडली तर त्यांच्याविरोधात उमेदवारही देऊ, असेही दवे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post