तिघांनी केले ११७ गुन्हे; शेवटी अडकले पोलिसांच्या जाळ्यात


वेब टीम : पुणे
शहर व ग्रामीण परिसरात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी यांसारखे गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणार्‍या तिघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली.

सराफाच्या दुकानातून पळ काढून जाताना हडपसर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 117 गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून 1 कोटी 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पैतरसिंग ऊर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय-19), निशांत अनिल ननवरे (वय-22) आणि ऋषिकेश तानाजी आतकर (वय-20) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 13 मोटारी, 5 दुचाकी, 38 किलो चांदी आणि 1 किलो 100 ग्रॅम वजनाचे दागिने असा 1 कोटी 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये 17 ऑक्टोबर रोजी औंध येथील नाकोडा ज्वेलर्स या दुकानातून लांबवलेले 26 तोळे सोने व 38 किलो चांदीचा समावेश आहे.

नाकोडा ज्वेलर्स या दुकानातून लांबवलेला मुद्देमाल घेऊन आरोपी मांजरी मार्गे जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाला मिळाली.

त्यावरून मांजरी येथील मोरे वस्ती येथील काम सुरू असलेल्या उड्डाणपूलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका मोटारीतून निघालेल्या तिघा आरोपींना ओळखून पोलिसांनी त्यांना पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता, मागील दीड वर्षात पैतरसिंग याने वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याचे सांगितले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील सोसायट्यांमध्ये शिरून त्याने अनेक चोर्‍या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी आतापयर्र्ंत 117 गुन्हे उघडकीस आणले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post