पुण्यात मुसळधार; झाले पाणीच पाणी


वेब टीम : पुणे
शहरात पावसाचा कहर सुरूच आहे. सर्वत्र कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दैना झाली. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अर्ध्या तासातच बहुतांश रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले.

अनेक घरे, वस्त्या आणि सोसायट्यांत पाणी शिरले. प्रचंड वाहतूक कोंडीने अक्षरश: शहर ठप्प झाले. सहकारनगर, येरवडा, विमाननगर परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

हडपसर, कात्रज, वारजे, धायरी, चांदणी चौक परिसरात वीजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या जोरदार पावसाने रौद्र अवतार धारण केला. रोजच पावसामुळे शहर तुंबत असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शहर व उपनगर परिसरात सुमारे तासभर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. मध्य वस्तीतील रस्त्यांवरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

वाहत्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. त्यामुळे टिळक रस्ता, सिंहगड, शास्त्री, सातारा, हडपसर, कर्वे, लक्ष्मी, कुमठेकर, जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यांसह बहुतांश रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मध्य वस्तीतील काही रस्त्यांवरून प्रचंड वाहणार्‍या पाण्यामुळे पायी चालणेही अशक्य होत होते. तर काही भागात पाणी तुंबल्याने दुकाने आणि घरांच्या दाराला पाणी पोहचले होते. स्वारगेट जवळील जेधे चौकात साचलेल्या पाण्यामुळे चारही रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती.

सिंहगड रस्त्यांवरही ठिकठिकाणी प्रचंड पाणी साचले होते. वाहत्या पाण्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. पाऊस थांबल्यानंतरही आकाशात काळेकुठ ढग कायम होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post