गडचिरोलीत चकमकीत २ माओवादी ठार; ५ जखमी


वेब टीम : गडचिरोली
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कवडेच्या जंगलात ७० हून अधिक माओवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा डाव जवानांनी उधळून लावला. चकमकीत दोन माओवादी ठार तर पाच जखमी झाले.

मागील काही वर्षांत माओवाद्यांना ऑगस्ट महिन्यातील शहीद सप्ताह, डिसेंबरमधील विशेष सप्ताहादरम्यान घातपाती कारवाया करता आलेल्या नाहीत. या विशेष सप्ताहामध्ये मोठी घटना घडवून आणण्याची माओवाद्यांची योजना होती.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याविषयीची माहिती मिळताच त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. दोन दिवसांपासून माओवाद्यांच्या हालचाली दक्षिण गडचिरोलीतील छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात दिसून येत होत्या.

आलापल्ली-भामरागड मार्ग बंद करून माओवाद्यांनी दोन गावांत पत्रकेही टाकली होती. नेलगुंड आणि कवडेपलीकडे असलेल्या इंद्रावती नदीच्या परिसरात माओवाद्यांचे संयुक्त विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सी-६० जवानांच्या विशेष तुकड्या गडचिरोलीहून पाठविण्यात आल्या.

शुक्रवारी सायंकाळी कवडेच्या जंगलात माओवाद्यांसोबत जवानांची पहिली चकमक उडाली. तर शनिवारी सकाळी माओवाद्यांचे शिबिर असलेल्या ठिकाणाला जवानांना घेराव घातला.

माओवाद्यांनी आयडीचा स्फोट घडवून आणत जवानांना अॅम्ब्युशमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर चकमक सुरू होती. यात दोन माओवादी ठार तर सुमारे पाच जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी पोलिसांना चार बंदुका, दोन आयडी प्रेशरबॉम्ब, वायर बंडल आणि औषधांचा साठा सापडला आहे.

चकमकीची माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांना मिळताच हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. त्यातून मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले.

मृतकांची ओळख पटविण्यात आली असून छत्तीसगडच्या हद्दीत सक्रिय असलेल्या नॅशनल इंद्रावती या कंपनी दलमचा प्लाटून पार्टी कमांडर सुखराम असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post