जिल्हा परिषदेसाठीही होणार महाविकास आघाडी : राजेंद्र फाळके


वेब टीम : अहमदनगर
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर ही महाविकास आघाडी आता स्थानिक पातळीवरही अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि समिती सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जानेवारीत पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

तसे झाल्यास नगर जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेनेला वाटा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेबरोबरच इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडी अधिक घट्ट करण्याचे स्थानिक नेत्यांचे प्रयत्न आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, काँग्रेसचे ज्ञानदेव वाफारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, स्वानंद वाघ, संतोष वाघ यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद व विविध ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा करुन त्यासंदर्भात नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आघाडीच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी लवकरच सयुंक्त बैठक घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तर जिल्हा परिषदेत तिन्ही पक्षाच्या ताकतीवर महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सुतोवाच केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post