जयंत पाटील की अजित पवार, कोण होणार उपमुख्यमंत्री? सस्पेन्स कायम


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे २२ डिसेंबरनंतर पक्षश्रेष्ठी घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिले आहेत.

तथापि, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढली असल्यानेच जाणीवपूर्वक हे बोलले जात असून मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वीच होईल, असे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते खासगीत देत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी दोन्ही पदे हवी होती.

मात्र, राष्ट्रवादीने यातील एकच पद मिळेल, असे स्पष्ट केल्यानंतर याबाबतचा वाद संपुष्टात आला आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात रस्सीखेच असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात बोलले जाते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post