छत्रपतींना वंशाचा पुरावा मागणे म्हणजे शिवसेनेचा उद्दामपणा; माफी मागण्याची चंद्रकांत पाटलांची मागणी

file photo

वेब टीम : मुंबई
उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणार्‍या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि सातार्‍याच्या गादीचा अपमान केला आहे.

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्याचा चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसत आहे.

शिवसेना या उद्दाम सवालाशी सहमत आहे का, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल, असे पाटील यांनी सांगितले.

उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल, तर ते समजू शकते. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींना उत्तर देता येत नाही, तर थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे.

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची, हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे असल्याची टीका पाटील यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates