गर्भवतीला जायचे होते रुग्णालयात; १०० जवानांनी केली मदत, मोदींकडून कौतुक


वेब टीम : श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लष्कराचे जवान त्यांच्या मदतीला धावले आहेत. अनेक ठिकाणी बचावकार्य हाती घेण्यात आलं.

बर्फवृष्टी सुरू असताना, एक गर्भवती महिला रुग्णालयात जात होती. त्याचवेळी लष्कराचे जवळपास १०० जवान तिच्यासोबत होते. तब्बल चार तास ते महिलेसोबत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांचे कौतुक केले आहे. आमच्या लष्कराचा अभिमान वाटतो, असं मोदी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी होत आहे. हिमवादळामुळं काश्मीरमधील अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाच्या घटनांमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांकडून काही ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे १०० जवान एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी धावल्याची माहिती चिनार कॉर्प्सकडून देण्यात आली. त्याचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला.

बर्फवृष्टी सुरू असताना शमीमा या महिलेला रुग्णालयात घेऊन जायचं होतं. तिला मदतीची गरज होती. त्याचवेळी १०० जवान तिच्या मदतीला धावून गेले. बर्फवृष्टीत जवान तिच्यासोबत चार तास चालले. अन्य ३० नागरिकही तिच्यासोबत होते. शमीमाला स्ट्रेचरवरून नेण्यात येत होतं. हे जवान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले. तिनं मुलाला जन्म दिला असून, दोघांची प्रकृती उत्तम आहे.

जवानांच्या या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. ’आपल्या लष्कराला शौर्य आणि माणुसकीसाठी ओळखलं जातं. जेव्हा देशवासियांना गरज असते, त्यावेळी आपलं लष्कर सर्वतोपरी मदत करतं. आपल्या लष्कराचा अभिमान वाटतो,’ असं ट्विट मोदींनी केलं. तसंच यावेळी मोदींनी शमीमा आणि तिच्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post