वेब टीम : दिल्ली कोरोनाच्या या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून, गुरुवारी अ...
वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून, गुरुवारी अजून काही व्यावसायिकांना सूट देण्यात आली.
त्यानुसार दूध डेअरी, ब्रेड बेकरी, पंखे व पुस्तकांची दुकाने सुरू होणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आवश्यक सेवा आणि त्यांची बँकेशी संबंधित काम करणारे लोक यांना सरकारने सूट दिली आहे.
गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी देशातील लॉकडाऊन आतापर्यंत समाधानकारक असल्याचे सांगत टाळेबंदीतून सूट मिळालेल्या आणखी काही नवी आस्थापनांची माहिती दिली.
यासोबतच प्रीपेड मोबाईल रिचार्जची दुकाने, दुग्धजन्य पदार्थांचे कारखाने, ब्रेड बनवणाऱ्या बेकरी, पंखे विक्रीची, शैक्षणिक पुस्तकांचे दुकाने, पीठ आणि डाळींच्या गिरण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय शहरी भागातील खाद्यान्न प्रक्रिया उद्योग, कृषी व फळबागा संशोधन संस्था, मध उत्पादन व वाहतूक यांनाही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
वीटभट्ट्या आणि रस्त्याची कामे सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील २१ एप्रिल रोजी राज्यांना पत्र पाठवण्यात आल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
गृहमंत्रालयाच्या नव्या वटहुकुमानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आल्याचे श्रीवास्तव म्हणाल्या.
केंद्राने दिलेल्या या सवलतीमुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.