वेब टीम : न्यूयॉर्क अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होत असल्याचा दावा केला आहे. मात्र हे संशोधन अद्...
वेब टीम : न्यूयॉर्क
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होत असल्याचा दावा केला आहे.
मात्र हे संशोधन अद्याप सार्वजनिक केलेले नाही.
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे.
यामुळे उन्हाळ्यात कोरोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे”.
“आतापर्यंतचा सर्वात मोठे निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचे लक्षात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
“तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचे समोर आले.
तापमान आणि आर्द्रता वाढवणे कोरोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे,” असेही त्यांनी सांगितले.
हे संशोधन मात्र अद्याप सार्वजनिक केलेले नाही. या संशोधनाचा अहवाल समिक्षा करण्यासाठी पाठणार आहे.
यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी झाला आहे.
तसेच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
“प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल,” असे शास्त्रज्ञांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संशोधनावर बोलताना आद्रर्ता आणि सूर्यप्रकाश कोरोनाचा खात्मा करते असे सांगितले.
“डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीच्या शास्त्रज्ञांनी एक अहवाल दिला असून त्यानुसार विषाणू वेगवेगळ्या तापमान, हवामान आणि पृष्ठभागावर कसा व्यक्त होतो याबद्दल माहिती दिली आहे”.
“नव्या संशोधनानुसार, विषाणू थंड आणि कोरड्या वातावरणात जास्त काळ टिकतो. तर दुसरकीडे उबदार आणि आर्द्रता असलेल्या वातावरण कमी वेळ टिकतो,” अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.