वेब टीम : पुणे आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या...
वेब टीम : पुणे
आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव, सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येईल.
विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्यसरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया असे सांगताना आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मियांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे.
या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
COMMENTS