भारत म्हणजे मॅच फिक्सिंग करणाऱ्या माफियांचं आश्रयस्थान; पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आरोप


वेब टीम : कराची
गेल्या काही वर्षात अनेक पाकिस्तानी खेळाडू सामना निश्चिती प्रकरणामध्ये दोषी आढळले.

अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यात पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्या नावाची भर पडली.

यानंतर मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान झालं असल्याची खंत अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली.

पण याच दरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मात्र मॅच फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडलं.

भारतात सर्वात जास्त मॅच फिक्सिंग माफिये राहतात असा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकीब जावेद याने केला आहे.

१९९० च्या दशकात सामना निश्चितीच्या भ्रष्टाचाराबद्दल अकीब जावेदने आवाज उठवला होता.

वसीम अक्रम, वकार युनिस, सलीम मलिक या खेळाडूंचे मॅच फिक्सिंग संदर्भात नाव घेतल्यानंतर अकीब जावेदला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या असं त्याने एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना सांगितले.

आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याने अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मला तर असं वाटतं की मॅच फिक्सिंग माफीयांचं आश्रयस्थान भारतच आहे. त्यांच्याविरोधात जे लोक आवाज उठवतात त्यांची कारकीर्द या ना त्या प्रकारे उद्ध्वस्त केली जाते.

मला मॅच फिक्सिंगविरोधात बोलल्यानंतर फिक्सर्सकडून अनेकदा धमकीचे फोन आले होते.

त्यांनी मला गंभीर इजा करण्याची धमकीदेखील दिली होती.

मॅच फिक्सिंग करण्यासाठी केवळ चार-पाच खेळाडूंची गरज असते आणि १९९० च्या दशकात ते फार कठीण नव्हतं, असं अकीब जावेद म्हणाला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ज्या प्रकारे मॅच फिक्सिंगचा आरोप असलेला महमद आमीर याला पुनरागमनाची संधी दिली, ते पाहून तर मॅच फिक्सिंग करणार्‍यांना प्रोत्साहनच मिळेल.

बर्‍याच वेळा संघाकडे दमदार कामगिरी करणारे खेळाडू होते, पण अनेक वेळा संघाने जाणूनबुजून वाईट खेळ केला, असा आरोपही त्याने केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post