कोकणात कुणाला मदत मिळत असल्याचं मला दिसून आलं नाही; फडणवीस


वेब टीम : मुंबई
पहिल्या दिवशी आज कोकणातील जनतेशी संवाद साधल्यानंतर एक बाब स्पष्ट झाली की, वादळ येऊन नऊ दिवस झाले;

पण कोकणात राज्य सरकारची कोणतीही मदत अद्याप पोहचलेली नाही.

राज्य सरकारने कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्येसुद्धा अनेक त्रुटी आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

दोन दिवसांच्या आपल्या कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवसाच्या पाहणीनंतर श्रीवर्धन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची प्रचंड मोठी हानी झाली आहे.

वादळ येऊन नऊ दिवस झाले; पण राज्य सरकारची कोणतीही मदत लोकांना मिळालेली नाही, हे लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रकर्षाने लक्षात आले.

ज्यांची घरे गेली आणि तात्पुरत्या शिबिरामध्ये राहतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.

त्यांना योग्य ठिकाणी निवाऱ्याची सोय करून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे.

बस आगारामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात लोक दाटीवाटीने ठेवले आहेत, ती स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे.

त्यांची अवस्था खुराड्यासारखी झाली आहे. प्रशासन निश्चितपणे प्रयत्न करीत असेल; पण त्याचा परिणाम होताना दिसत नाही.

कुणाला मदत मिळते आहे, असे मला या दौऱ्यात दिसून आले नाही. शासन आणि प्रशासनाने अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्येसुद्धा अनेक त्रुटी आहेत. शेती, फळबागांचे नुकसान झाले, तर पुढच्या वर्षी ते भरून निघत असते.

पण, येथे तर झाडंच राहिली नाहीत. नव्याने उत्पन्न सुरू होण्यासाठी किमान पुढचे ५ ते १० वर्षे लागतील, अशी स्थिती आहे.

अशात केवळ हेक्टरी मदत जाहीर करून भागणार नाही. कोकणात अल्पभूधारक मोठ्या संख्येने असल्याने १० हजारांवर कुुणाला मदत मिळणार नाही.

अशात थेट आर्थिक मदत देण्याची आज नितांत गरज आहे. १०० टक्के अनुदानातून फळबाग योजनेचा लाभ दिला पाहिजे.

मासेमारांचे तर फार मोठे नुकसान झाले आहे. मासेमारांसंदर्भात अजून कोणतीही मदत जाहीर नाही.

होड्यांसाठी त्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे. त्यांच्यावर कर्ज आहे. ते दुष्टचक्रात अडकले आहेत.

घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना टिन, सिमेंट पत्रे हवे आहेत; पण त्याचा काळाबाजार होत आहे.

त्यामुळे शासनाने यात मध्यस्थी करण्याची गरज आहे. वीज व्यवस्था सुरळीत होईल, याची तातडीने काळजी घेण्याची गरज आहे.

अंधार तर आहेच; शिवाय पाणी पुरवठा योजना बंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post